कळंबोली : शहरात जागोजागी झोपड्या उभ्या रहात आहेत. या अनधिकृत झोपड्यांकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या झोपड्यांवर कारवाई होणार तरी कधी असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत. कळंबोली शहरातील सिडको कार्यालयासमोरील बीडीयुपी क्षेत्रात सुमारे १०० झोपड्या कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत, तर सिंग हॉस्पिटल, रोडपाली गावात जाणारा रस्ता तसेच इतर ठिकाणी पदपथावरही झोपड्या बांधल्या जात आहेत, तर बऱ्याचशा फुटपाथवर कँटीनच्या टपऱ्या उभ्या आहेत. स्टील बाजारात तर जागोजागी कँटीन व चायनीजच्या टपऱ्या थाटल्या आहेत. महामार्गाशेजारी शहराचा दर्शनी भाग विद्रूपच झाला आहे, असे असताना संबंधित खाते मात्र दुर्लक्ष करीत आहेत. उंचउंच इमारती उभ्या रहाणाऱ्या सिडको वसाहतीत कामानिमित्त परप्रांतीय लोक तितकेच वाढत आहेत. परिणामी, मिळेल तिथे ते बस्तान बांधत आहेत. फेरीवाले व बांधकामाबरोबरच झोपड्या वाढत आहेत. कामानिमित्त येणारे परप्रांतीय जागा नसल्यास कळंबोलीतील रिकाम्या जागी झोपड्या बांधत आहेत. झोपडपट्टीच्या बाजूनेच जाणाऱ्या पाईपलाईनला छिद्र पाडून पाणी घेतले जाते. सिडको अधिकाऱ्यांना विचारले असता अतिक्रमण विभागात कळविल्याचे सांगतात.
कळंबोलीत झोपड्यांचे जाळे
By admin | Updated: October 7, 2014 22:52 IST