Join us  

कोरोना पार्श्वभूमी : डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : तिघांचा अंतरिम जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 7:17 PM

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणातील तीन आरोपींचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुटका करण्यात आली.

कोरोना पार्श्वभूमी : डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : तिघांचा अंतरिम जामीन मंजूर

 मुंबई : डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणातील तीन आरोपींचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात डोंगरी येथील इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. तिन्ही आरोपी धर्मदाय ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांच्या मालकीची ही इमारत होती. १२ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांचे वय आणि त्यांना असलेले आजार विचारात घेता कोरोनाच्या भीतीने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

सफदारली हुसेन अली करमाली, शब्बीर दोस्त मोहम्मद मुकादम, बरकत अली हुसेन अली युनिया या तीन आरोपींनी अंतरिम जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. या तिघांचेही वय ६२ ते ७४ दरम्यान आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेन्शन व ह्दयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांना कारागृहात ठेवणे योग्य नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन न्यायालयाने म्हटले की, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांतर्गत त्यांना जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होणार नाही. त्यांचे वय आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी त्यांची जामिनावर सुटका करण्यास बांधील आहे. न्यायालयाने या तिघांचीही ३०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. तसेच साक्षीदारांशी संपर्क न साधण्याचा व न्यायालयाच्या परवानगीशिवाय घर न सोडण्याचे निर्देश न्यायालयाने या तिघांना देत पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी ठेवली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस