Join us

महामार्गाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: November 11, 2016 03:36 IST

गेली अनेक वर्षे सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या खांदा वसाहत येथील रस्त्यावरील अनधिकृत दुकाने, गाळे यांच्यावर कारवाई होत नव्हती

पनवेल : गेली अनेक वर्षे सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या खांदा वसाहत येथील रस्त्यावरील अनधिकृत दुकाने, गाळे यांच्यावर कारवाई होत नव्हती. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये पहिल्यांदाच खांदा कॉलनी येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. महामार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर गाळे, लहान हॉटेल, वाईन शॉप जमीनदोस्त करण्यात आले.खांदा वसाहतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्र मण दिवसेंदिवस वाढतच चालले होते. याबाबतच्या अनेक तक्रारी रस्ते मंडळाकडे करण्यात आलेल्या होत्या. अखेर गुरुवारी येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले. पनवेल महापालिकेची ही सर्वात मोठी कारवाई बोलली जात आहे.अतिक्रमणाविरोधात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईला खांदा कॉलनी येथे सुरुवात झाली. प्रत्यक्ष महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे खांदेश्वर पोलीस आणि सिडकोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लवाजाम्यासह उपस्थित राहिले होते. या वेळी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या कारवाईमध्ये कलिंगड विक्रे त्यांचे गाळे, फर्निचर विक्रे त्यांचे गाळे, ढाबा, तसेच एक वाईन शॉप आणि छोटे-मोठे हॉटेल तसेच नर्सरीचाही समावेश आहे. सदर कारवाई सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. महामार्ग विस्तारीकरणामुळे या कारवाईशिवाय पर्याय नव्हता, अशी एकच चर्चा या वेळी उपस्थित नागरिक करत होते. कारवाई करताना येथील दुकानदारांनी एका दिवसाची मुदत मागितली. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी नोटिसा पाठवल्या होत्या, असे उत्तर देऊन आपली कारवाई सुरूच ठेवली. पनवेल महानगराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी कोणतीही तडजोड न करता कठोरपणे जनहिताचे निर्णय घेऊन कामे करावी लागतील, अशी आयुक्तांची भूमिका आहे. सदर कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण झाले नाही तर पुन्हा अतिक्र मण होईल अशीही भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या वेळी उपायुक्त मंगेश चितळे, सहआयुक्त खाडे व वपोनि अमर देसाई, सिडकोचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)