मुंबई : मजा, मस्ती म्हणून पोलिसांच्या अंगावर फटाके उडविणारे दोघेही उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. या दुकलीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.आग्रीपाडा येथील रहिवासी असलेले हनन युसूफ शेख (३३), साय्यद कफिल्लुर रेहमान ( २२) हे शनिवारी रात्रीपासून नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, डोंगरी अशा भागात फटाके फोडत स्कूटीवरून दक्षिण प्रादेशिक कार्यालयाजवळ पोहोचले. बाजूलाच राज्य दहशतवादविरोधी पथकाचे मुख्यालय आहे. येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस बघून दोघांनीही मजा, मस्ती म्हणून त्यांच्या दिशेने सुतळी बॉम्ब फोडून पळ काढला. हे दोघेही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला आहेत. एक सहायक व्यवस्थापक पदावर तर दुसरा अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली त्यांच्याकडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मजा, मस्ती म्हणून पोलिसांच्या अंगावर फटाके उडविणारे उच्चशिक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:02 IST