प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल विधानसभा मतदारसंघातील चुरस उत्तरोत्तर वाढत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध युक्त्या लढवित आहेत. यातच प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रथाकडेही उमेदवारांनी विशेष लक्ष दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत लक्षवेधक असे प्रचाररथ उमेदवारांनी तयार केले असून ते सर्वांचे लक्ष वेधत आहेत.दळणावळणाची साधने नसल्याने उमेदवार पूर्वी बैलगाडीने गावोगावी प्रचाराला जायचे. नंतर ते एसटीने जाऊ लागले. सायकलवर फिरतही उमेदवारांनी प्रचार केला आहे. कार्यकर्ते त्यांच्यासमवेत असायचे. यावेळी प्रचाररथ वा इतर वाहने नव्हती. बदलत्या पद्धतीनुसार उमेदवारही बदलले आहेत. प्रचारयंत्रणाही हायटेक झाली आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांकडे उमेदवार अधिक लक्ष देताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उमेदवारांचे प्रचारथ पहायला मिळत आहेत. मतदारसंघात फिरण्यासाठी या प्रचाररथाचा वापर उमेदवार करीत आहे. आपली ओळख, तसेच आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या रथाच्या माध्यमातून केला जातो. विरोधी उमेदवार आपल्याला वरचढ नको, यासाठी प्रत्येक गोष्टीत विशेष काळजी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून विरोधी उमेदवारांपेक्षा प्रचाररथ अधिकाधिक सुंदर व आकर्षक बनविण्याकडे उमेदवारांनी लक्ष दिले आहे. प्रचाररथ रस्त्यावरून जाताना मतदार त्याकडे आकर्षित झाला पाहिजे, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. रथाकडे पाहताच उमेदवार कोण आहे, चिन्ह काय आहे, याचा मतदाराला त्वरित उलगडा व्हायला हवा. सुटसुटीत मजकूर लिहून उमेदवाराची माहिती दिली जात आहे. अशा प्रकारे भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाररथ मतदारसंघात फिरत आहे. त्यांचे आकर्षक छायाचित्र या प्रचाररथावर लावले आहे, तसेच नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रेही रथावर झळकत आहेत. कमळाच्या चिन्हाची मोठी प्रतिकृतीही या प्रचाररथावर लावली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी रथावर रंगछटाही अनेक आहेत, तसेच मोठ्या वाहनांमध्ये शिवसेनेचे उमेदवार वासुदेव घरत यांच्या छायाचित्रासह वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे असलेले प्रचाररथ आहेत. दोन्ही बाजूंनी आकर्षक रोषणाई केलेले प्रचाररथही दिसतात. यामध्ये उमेदवाराविषयीच्या माहितीचे फलक उभारण्यात आले आहेत.
प्रचाररथ झाले ‘हायटेक’
By admin | Updated: October 8, 2014 23:03 IST