Join us  

चार प्रभागातील पोटनिवडणुकांना उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 5:21 PM

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, मालेगाव, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पश्‍चिम उपनगरांमधील रिक्त झालेल्या चार प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयान तात्पुरतीे स्थगिती दिली आहे. चार नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी नगरसेवकपदावर हक्क सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मुंबईसह राज्यातील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागेवरील एकूण 10 महानगर पालिकांमध्ये  पोटनिवडणूक होणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना गेल्या दि, 9 मे रोजी जारी केली आहे.या पोटनिवडणूकांचे वृत्त लोकमत ऑनलाईनवर सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते.

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, मालेगाव, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे यांनी ही अधिसूचना जारी केली होतीे.त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितिन बंडोपंत सलाग्रे (काँग्रेस), गीता भंडारी, संदीप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणातील लघुवाद न्यायालयात काही याचिका अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आयोग अशाप्रकारे निवडणूक जाहीर करू शकत नाही. अशाप्रकारे आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या कोर्टातील प्रलंबित दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असंही याचिकाकर्त्यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आलं. हायकोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर यावर अंतिम सुनावणी दि.10 जून रोजी होणार असून आयोगाला दि.12 जूनपर्यंत निवडणुका जाहीर करण्यास मनाई केली करत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात यावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

 महापालिकेच्या 2017च्या मुंबईतील प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक राजपत यादव,32 च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी, 76 च्या भाजपा नगरसेविका केशरबेन पटेल,81 चे भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अवैध जातीच्या दाखल्याने न्यायालयाने रद्ध केले होते. निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.याच पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 28,32,76, 81 मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरु केली आहे.निवडणूक आयोगाने सध्या केवळ मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रभागात अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मतदारयाद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता आहे, असं निवडणूक आयोगाच्या वतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आलं.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकानिवडणूकउच्च न्यायालय