Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाला तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतला तातडीचा दिलासा ...

पासपोर्ट नूतनीकरण प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.

न्या. एस. एस. शिंदे व न्या. जी. ए. सानप यांनी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांना सोमवारी अन्य खंडपीठापुढे याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली. तसेच कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या निर्मात्यालाही बाजू मांडण्याची मुभा दिली.

कंगनाला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुडापेस्टला जायचे आहे. मात्र, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याने पासपोर्ट प्रशासनाने तिच्या पासपोर्टच्या नूतनीकरणास नकार दिला आहे. शुक्रवारच्या सुनावणीत सिद्दिकी व चित्रपटाच्या निर्मात्याच्या वतीने ॲड. हृषीकेश मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले की, चित्रीकरणाचे वेळापत्रक आधीच ठरवलेले आहे. कंगना बुडापेस्टला पोहोचू शकत नाही म्हणून चित्रीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे दरदिवशी १५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

त्यावर खंडपीठाने न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याचे सांगितले. आम्ही रात्रंदिवस काम करावे, असे नाही. पण तुम्हाला तातडीने सुनावणी घेण्याकरिता अर्ज करण्याची मुभा देत आहोत, असे न्यायालयाने सांगितले.

गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कंगना रनौतला पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले होते.

वांद्रे पोलिसांनी कंगना व तिची बहीण रंगोली हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे. ट्विटद्वारे तिने दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिच्याविरोधात करण्यात आली आहे.

.........................................