Join us  

‘पानिपत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटील यांना दिलासा देण्याचा उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 12:31 AM

१९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पानिपत’ या पुस्तकाच्या नावावरून चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले.

मुंबई : आशुतोष गोवारीकर यांनी ‘पानिपत’ चित्रपटासाठी आपल्या कथेचा व संकल्पना चोरल्याचा आरोप करत प्रसिद्ध लेखक व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी उच्च न्यायालयात कॉपीराइटचा दावा दाखल केला. मात्र, उच्च न्यायालयाने सकृतदर्शनी कॉपीराइटची केस बनत नसल्याचे म्हणत पाटील यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी अर्जुन कपूर, क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या पानिपत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.१९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पानिपत’ या पुस्तकाच्या नावावरून चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले. मात्र, यासाठी आपली परवानगी घेण्यात आली नाही, असे पाटील यांनी दाव्यात म्हटले आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठापुढे होती. मराठ्यांना शूर, बलाढ्य दाखविण्याचा प्रयत्न केवळ आपणच ‘पानिपत’मधून केला. तसेच सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वती, याही शूर असल्याचे आपण आपल्याच कादंबरीमधून दाखविले आहे. अन्य कोणीही असा प्रयत्न केला नाही. त्यामुळे गोवारीकर यांनी त्यांच्या ‘पानिपत’ चित्रपटासाठी आपल्या पुस्तकाची कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केला आहे. हा चित्रपट आपल्याला दाखविण्यात यावा. तोपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती द्यावी, अशी विनंती पाटील यांनी न्यायालयाला केली.तर गोवारीकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी पाटील यांचा दावा फेटाळला. मराठ्यांच्या या युद्धाबाबत गेले दीड वर्ष आमची टीम संशोधन करत आहे. आम्ही स्वत:च चित्रपटाची पटकथा तयार केली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही आम्ही सतत बदल केले. चित्रपटासाठी आम्ही पाटील यांच्या कादंबरीचा आधार घेतला नाही, असा युक्तिवाद गोवारीकर यांच्यातर्फे कदम यांनी केला. मराठ्यांना शूर, बलाढ्य दाखविणे यावर कॉपीराइट सांगता येणार नाही. ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर कुणी अधिकार सांगणे अयोग्य आहे. सकृतदर्शनी ही केस कॉपीराइटची नाही, असे म्हणत न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार दिला.

टॅग्स :पानिपतन्यायालय