Join us

उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:35 IST

वरळी येथील साकेत शासकीय वसाहतीत ५३ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहतात

मुंबई : विमा योजनेत गुंतवलेल्या पैशांचा मोबदला देण्याच्या नावाखाली उच्च न्यायालयातील अधिकाºयाला ठगाने जाळ्यात ओढले. पावणेचार लाख उकळल्यानंतर आणखीन रक्कम काढण्याच्या प्रयत्नात असतानाच, ते सतर्क झाले. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरळी येथील साकेत शासकीय वसाहतीत ५३ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहतात. ते उच्च न्यायालयात मास्टर अ‍ॅण्ड असिस्टंट प्रोथोनोटरी म्हणून काम करतात. पगारातील बचतीतून त्यांनी २०१६ मधून विम्यामध्ये गुंतवणूक सुरू केली. १७ आॅक्टोबरला आलेल्या कॉलधारकाने, विमा लोकपाल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. विम्याचे ३ लाख ७५ हजार रुपये आल्याचे सांगून ते घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगितला. त्याने पाठविलेल्या लिंकवरून त्यांनी अर्ज भरून त्याला पाठविला. त्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये भरण्यास सांगितले. पुढे आणखीन रकमेचे आमिष दाखवून ठगाने त्यांच्याकडून महिनाभरात ३ लाख ७५ हजार रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी करत, तुमचे पैसे शासनाच्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाकडे जमा असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी पैसे देणे थांबविले. अखेर याबाबत त्यांनी बुधवारी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

टॅग्स :धोकेबाजी