मुंबई : समाजाचे भले करण्यासाठी जनहित याचिका दाखल करत असल्याचा दावा करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला खरोखरचे सामाजिक कार्य करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी एक आठवडा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
एक खासगी कंपनी जागेचा गैरवापर करत आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका दाखल करणारे राकेश चव्हाण यांना मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व भारती डांगरे यांच्या खंडपीठाने समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचे काम अविरतपणे करणारे अफ्रोज शहा यांच्याबरोबर समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा आदेश दिला. २ सप्टेंबरपासून पुढील एक आठवडा अफ्रोज शहा त्यांना जे काम देतील ते त्यांनी करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकाकर्ता हा याचिकांवर याचिका दाखल करत असतो. कोणतेही खासगी बांधकाम उभे राहत असले की याचिकाकर्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करतो. नेस्को सध्या त्या भूखंडावर असलेले एक्झिबिशन हॉल पाडून नवा हॉल बांधत आहे, असे ढाकेफाळकर यांनी न्यायालयाला सांगितले.त्यानंतर याचिकाकर्त्यांनी हे सर्व आपण समाजाच्या भल्यासाठी करत आहोत, असे न्यायालयाला सांगितले. त्यांच्या या विधानाची दखल घेत न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करायचे आहे तर मग तुम्ही खरेखुरे समाजकार्य करा. एक आठवडा समुद्रकिनारा स्वच्छ करा किंवा अफ्रोज शहा देतील ते काम करा.