Join us  

स्मशानभूमींप्रश्नी मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:38 PM

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध भागांतील स्मशानभूमींवर ताण वाढत आहे.

 

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध भागांतील स्मशानभूमींवर ताण वाढत आहे. विशेषतः शिवाजी पार्क व चंदनवाडी स्मशानभूमी सरकारी व महापालिका रुग्णालयांच्या जवळपास असल्याने यावरील ताण अधिक वाढला आहे. या ठिकाणील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करवी व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च  न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेमुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले.

या दोन्ही स्मशानभूमींजवळ राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे व त्यांच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकार जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरच्या नियमांचे पालन करत नाही. रुग्णांचे शव 'लिक प्रूफ बॅगे' मध्ये नीट गुंडाळून देत नाही. तसेच मृत रुग्णावर अंतिम संस्कार करणाऱ्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शवाला १ टक्के हायपोक्लोरिन लावत नाही. राज्य सरकारला सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ऍड. अपर्णा व्हटकर  यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केेली.

शुक्रवारी मुंबई महापालिकेने आपण आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय करत असल्याचे न्यायालयाला सांगितले.  

तर व्हटकर यांनी आपल्याकडे पालिका आवश्यक ती काळजी घेत नसल्याचे सिद्ध  करण्यासाठी कागदपत्रे असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने व्हटकर यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनतर पालिकेला त्यावर म्हणणे मांडण्याचे निर्देश देत या याचिकेवरील पुढील सुमावणी शुक्रवारी ठेवली.

स्मशानभूमींतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सरकारला भर्ती करण्याचे आदेश द्यावेत व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे.

सोमवारी शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी येथील स्मशानभूमीवर अधिक ताण येत असल्याबद्दल व आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने रहिवाशांनी मूक आंदोलन केले होते.

टॅग्स :उच्च न्यायालयकोरोना वायरस बातम्यामुंबई