Join us

येथे चालतो भीतीचा तास!

By admin | Updated: August 4, 2014 01:26 IST

चहूबाजूंनी टेकूंचा आधार, त्यात सुरू असलेली गळती, मोठा आवाज झाला तरी कोसळण्याच्या अवस्थेत असलेली इमारत.

मनीष म्हात्रे, मुलुंडचहूबाजूंनी टेकूंचा आधार, त्यात सुरू असलेली गळती, मोठा आवाज झाला तरी कोसळण्याच्या अवस्थेत असलेली इमारत. हे एखाद्या जुन्या पडक्या इमारतीचे वर्णन नसून चक्क दररोज भरत असलेल्या महापालिकेच्या मुलुंड कॉलनीतील मुलुंड कॅम्प शाळेची अवस्था आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या या शाळेच्या इमारतील प्रत्येक तास विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही भीतीचा ठरत आहे.पस्तीस वर्षे जुनी असलेली ही पालिकेची पाच मजली इमारत टेकूंच्या आधारावर उभी आहे. शाळेला एकच जिना असून, तो कधीही कोसळू शकतो. बांबंूचा आधार देण्यात आलेल्या जिन्यावरून दररोज विद्यार्थ्यांची ये - जा सुरू असते. या शाळेत सुमारे ९६0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सकाळ आणि दुपार या दोन सत्रांमध्ये मराठी, इंग्रजी आणि गुजराती माध्यमांचे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असतानाही या शाळेत वर्ग भरवले जात आहेत. त्यात पावसाळ्यात पडझडीचे प्रकारही वाढत असल्याने शाळा प्रशासनाकडे पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. शाळेच्या भिंती, वर्गातील खिडक्यांना तडे गेले आहेत. त्यात गळतीमुळे भिंती ओल्या पडत चालल्या आहेत. अशात ओलाव्यात विजेचा धक्का बसण्याची धास्तीही असते. वर्गात बसल्यानंतर प्रत्येक तास जीवघेणा वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वर्गांत बसल्यानंतर कधी कुठला भाग कोसळेल या भीतीखालीच ते वावरत आहेत. मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शाळेत प्युरीफायर बसविण्यात आले असले तरी ते केवळ नावापुरतेच. दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या सभागृहालाही अवकळा आली आहे. सध्या त्याचा वापर अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. शाळेतील पालकांनी यासाठी वारंवार शाळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र त्यातून काहीच साध्य होत नसल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिकांनी टी विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुलुंड टी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.