मुंबई : सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (वय ४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी हेमा यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे हलविली आहेत. त्याबाबत शाहनिशा करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी विद्याधर राजभर उर्फ गोटू हा अद्याप फरारी आहे. हेमा आणि भंबानी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी विजयकुमार राजभर, प्रदीपकुमार राजभर आणि आझाद राजभर या तिघांना अटक केल्यानंतर,त्यांना न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी २२ डिसेंबरपर्यंत वाढविल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्यांनी ज्या टेम्पोचा वापर केला होता, तो टेम्पो बुधवारी पोलिसांनी हस्तगत केला आहे, तसेच भंबानी यांची कारदेखील पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पोलिसांनी बनारसमधून ताब्यात घेतलेल्या शिवकुमार उर्फ साधू यालादेखील न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हेमाचा पती चिंतन याच्यावर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची शहनिशा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. अहवाल प्रलंबितच !हेमा व भंबानीच्या मृत्यूचे नेमके कारण सांगणारा अहवाल हा अद्याप प्रलंबितच असल्याचेही त्यांनी नमूद आहे. अहवाल लवकरात लवकर देण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे, जेणेकरून त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे उघड होऊन पुढील तपासाला गती मिळेल.
हेमाच्या नातेवाईकांच्या आरोपांची चौकशी सुरू
By admin | Updated: December 20, 2015 00:57 IST