नवी मुंबई : गरीब व असहाय्य मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दाम्पत्याला एपीएमसी पोलिसांनी बिलासपूर येथून अटक केली आहे. हिरन्मय उर्फ हिर बुढ्ढा बिरंची कबीराज (६२) आणि रुनु (२८) असे या दाम्पत्याचे नाव आहे. आरोपी हिरन्मय व त्याची पत्नी रुनु हे कोपरी गावात राहावयास होते. या परिसरात त्यांची पानाची टपरी होती. रुनु ही वेश्या व्यवसायाशी संबंधीत असल्याने हे दोघे पती - पत्नी परिसरातील गरीब व असहाय्य असलेल्या अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर ते त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत असत. आरोपी हिरन्मय याने कोपरीतील दोन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर सदर मुलींना वेश्या व्यवसायासाठी नेरूळ येथील बांधकाम व्यावसायिक दिनेश घाडगे याच्याकडे नेऊन सोडले. घाडगे याने या पीडित मुलींना लोणावळा येथील आपल्या फार्म हाउसवर नेवून त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांना पुन्हा कोपरी येथे आणून सोडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त उमाप यांनी दिली. कोपरी भागात राहणाऱ्या आशा राऊत या महिलेला या प्रकारची माहिती कळताच त्यांनी या मुलींना धीर देऊन पोलीसांत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक माया मोरे यांनी याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सर्वप्रथम घाडगे याला अटक केली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेल्या हिरन्मय व त्याची पत्नी रूनु यांना ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)
असहाय्य मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले
By admin | Updated: August 15, 2014 01:50 IST