Join us

दहावी मूल्यमापनाचे निकष अंतिम करण्यासाठी विधितज्ज्ञांचीही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST

शिक्षण मंडळ, शिक्षण विभाग लवकरच मुख्यमंत्र्यांशी निकषावर चर्चा करून न्यायालयात बाजू मांडणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीबीएसई मंडळाप्रमाणे ...

शिक्षण मंडळ, शिक्षण विभाग लवकरच मुख्यमंत्र्यांशी निकषावर चर्चा करून न्यायालयात बाजू मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सीबीएसई मंडळाप्रमाणे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत शिक्षण विभागाकडून अंतिम निकष म्हणजे मूल्यमापनाचा फॉर्म्युला तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करताना किंवा न्यायालयात ते सादर करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून मदत घेतली जात आहे. तयार झालेल्या अंतिम निकषांची येत्या २ दिवसांत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करण्यात येईल आणि दहावी मूल्यमापनाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातले कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन दहावीच्या रद्द केलेल्या परीक्षांचा घाट पुन्हा घालणे व्यवहार्य नाही, अशी भूमिका शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी झालेल्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही मांडली. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला आणि शासनाला या आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ दिला आहे. त्यामुळे हे निकष न्यायालयासमोर मांडले जाऊन दहावीची परीक्षा रद्द का केली, त्याला काय पर्याय आहेत, याची बाजू मांडण्यात येणार आहे. त्यानुसार, राज्य शिक्षण मंडळाकडून मूल्यमापनाचे निकष तयार करण्यात येत असून विधितज्ज्ञ आशुतोष कुंभकोणी त्यात शिक्षण विभागाला मदत करत आहेत. दहावीच्या निर्णयासोबतच अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी काय पर्याय आहेत? ती प्रक्रिया कशी पार पाडण्यात येईल? नियोजन कसे येईल? याचाही आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.