Join us
Daily Top 2Weekly Top 5

कठीणसमयी लाभली गोरेगावकरांची साथ - वसंत ढोबळे

By admin | Updated: June 9, 2015 01:47 IST

न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तताही केली, त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही, अशा कृतज्ञतापूर्वक शब्दांत निवृत्त पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांनी गोरेगावकरांचे आभार मानले.

मुंबई : डी.एन. नगर पोलीस ठाण्यात नियुक्तीला असताना दोन वर्षांची शिक्षा होऊन तुरूंगात पाठवले, नोकरीतून बडतर्फ झालो. त्यावेळी गोरेगावकरांनी बंद पाळला. शिवाय, माझ्या वकिलाच्या फीसाठी वर्गणीतून चार लाखांचा निधी जमविला. गोरेगावात घर घेण्यातही गोरेगावकरांचे योगदान आहे. न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तताही केली, त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही, अशा कृतज्ञतापूर्वक शब्दांत निवृत्त पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांनी गोरेगावकरांचे आभार मानले.प्रबोधन क्रीडा भवनाच्या मैदानावर गोरेगाव नागरिक मंच आणि गोरेगाव मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वसंत ढोबळे यांच्या पोलीस सेवेतील कारकिर्दीला सलाम करण्यासाठी नागरी सत्कार पार पडला. महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोबळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ढोबळे यांच्या पत्नी मंगला ढोबळे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, गोरेगाव मंचचे अध्यक्ष विरेन लिम्बाचिया, नगरसेवक दिलीप पटेल, नगरसेविका लोचना चव्हाण उपस्थित होते.आपले बालपण, कठीण परिस्थितीत घेतलेले शिक्षण, पोलीस प्रशिक्षण ते पोलीस दलातील सेवा, सेवेतील प्रसंग आणि या प्रवासात मिळालेली जनतेची साथ मोलाची असल्याचे मनोगत ढोबळे यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच गोरेगावमधील बालमजूर आणि महिलांच्या सुरक्षेकडे स्वत: लक्ष देऊन मुंबईसमोर आदर्श ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच आजची तरुण पिढी गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे सांगत त्याबद्दल चिंताही व्यक्त केली. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत जागरूक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)