Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो लीड : कोविड काळात अग्निसुरक्षा कायदा व अग्नी सुरक्षा यंत्रणा धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडच्या काळात अग्निसुरक्षा कायदा व अग्नी सुरक्षा यंत्रणा धाब्यावर बसवूनच बरीच शासकीय व खासगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविडच्या काळात अग्निसुरक्षा कायदा व अग्नी सुरक्षा यंत्रणा धाब्यावर बसवूनच बरीच शासकीय व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यांना कोविड सेंटर म्हणून परवानगी दिली गेली आहे. त्याचप्रमाणे मोकळ्या जागेमध्येसुद्धा शासनाने मोठमोठी तंबूवजा कोविड सेंटर उभारली आहेत. येथे योग्य ती अग्निसुरक्षा पुरविणे गरजचे आहे, असे मत अग्निशमन क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, तंबूवजा कोविड सेंटर येथे अग्निशमनाचे पाईप व कनेक्शन बसू शकतील, अशा प्रकारचा कमीत कमी पाण्याचा टँकर अथवा स्टॅटिक टॅंक, अग्निशमनाचे पाईप व कनेक्शन, पोर्टेबल अग्निशमन पंप व तात्पुरत्या काळाकरिता करार पद्धतीवर पुरवठा करून प्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे, असेही नमूद केले आहे.

मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अग्निशमन अधिकारी सुभाष कमलाकर राणे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोविडचा विचार करून सरकारी दबावाखाली खासगी रुग्णालयांना अग्निशमन दलातर्फे परवानगी दिली गेली असेल, तरी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ व नियम २००९ नुसार पूर्णपणे लायन्सस प्राप्त अभिकरणाची व वहिवाटदार / मालक यांचीच आहे. जर वहिवाटदार / मालक यांनी लायन्सस प्राप्त अभिकरणाची नेमणूक केली नसेल, तसेच जानेवारी व जूनमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे, याचे प्रमाणपत्र अग्निशमन सेवेमध्ये जमा केले नसेल तर सर्वस्वी ही जबाबदारी वहिवाटदार / मालक यांच्यावरच जाते.

राष्ट्रीय इमारत संहिता २०१६ व विकास नियंत्रण नियमावलीमध्ये हॉस्पिटल बिल्डिंग्स ही संस्थागत इमारत प्रकारात मोडते. अग्निसुरक्षेचा विचार केल्यास वहिवाटदार भार, क्षमता घटक, बाहेर जाण्याच्या मार्गिकेची रुंदी, जिना, उद्वाहक, इक्स्टिंगग्विशर तसेच आग विझविण्यासाठी बसविण्याची अग्निशमन यंत्रणा अशा अनेक बाबतीत अनेक उपाययोजना या नियमावलीमध्ये सुचवलेल्या आहेत. या नियमावलीची योग्य पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ व नियम २००९ यानुसार योग्य ती कारवाईसुद्धा करणे शक्य आहे. हा कायदा अंमलात येऊन आज १० वर्षांहून ही जास्त काळ लोटला, पण या कायद्याची अंमलबजावणी योग्य होत आहे का ? हा प्रश्न आहे, असेदेखील सुभाष कमलाकर राणे यांनी सांगितले.

------------------------

- लायन्सस प्राप्त अभिकरणाने अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये न ठेवल्यास या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करता येऊ शकते.

- मुंबईसारख्या शहरातील प्रत्येक इमारतीतील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे चेक करणे अग्निशमन दलातील अधिकारीवर्गाला त्याच्या इतर कामाच्या जबाबदारीमुळे नक्कीच शक्य नाही.

- त्यामुळेच अग्निशमन कायद्यानुसार ही जबाबदारी लायन्ससप्राप्त अभिकरणाला देण्यात आलेली आहे.

- अग्नी व जीवन सुरक्षाबाबत त्रितिय पक्षी अग्नी लेखा परीक्षण हे १५ मीटरपेक्षा उंच इमारतीने ज्याच्याकडे योग्य प्रकारचे अग्नी व जीवन सुरक्षाबाबतच्या तपासणीचा अनुभव आहे त्याच्याकडून करून घेतले पाहिजे.

- सर्व प्रथम इमारतीमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयामधील अग्निशमन यंत्रणा ताबडतोब अद्ययावत करण्यात आल्या पाहिजेत.

- कमी उंचीच्या कोविड रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह प्रकारची अग्निशमन यंत्रणा नसेल, तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची इक्स्टिंगग्विशर ठेवण्यास कोविड रुग्णालयांना बंधनकारक केले पाहिजे.

- डॉक्टर व वैद्यकीय स्टाफना याबाबत प्रशिक्षण बंधनकारक केले पाहिजे. ज्याठिकाणी धोके जास्त वाटत असतील, अशा ठिकाणी काही काळाकरिता अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करार पद्धतीवर करण्यास कोविड रुग्णालयांना बंधनकारक केले पाहिजे.

- इक्स्टिंगग्विशर पुरवली गेली पाहिजेत. त्याचबरोबर डॉक्टर व वैद्यकीय स्टाफना इन-हाऊस अग्निशमन यंत्रणेबाबत प्रशिक्षण बंधनकारक केले पाहिजे.