मुंबई : गणेशमूर्तींची उंची कमी करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी फेटाळला आहे़ त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात मूर्तींच्या उंचीची स्पर्धा मंडळांमध्ये कायम असणार आहे़गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळे ११ दिवसांसाठी गणेशमूर्तींची स्थापना करतात़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गणेशमूर्तींची उंची वाढविण्याची स्पर्धाच मंडळांमध्ये सुरू आहे़ पावसाळ्याच्या दरम्यानच गणरायाचे आगमन होत असल्याने उंच मूर्ती मंडपापर्यंत नेणे तसेच गणेश विसर्जनाच्या वेळीही विशेष काळजी घ्यावी लागते़ त्यामुळे मूर्तीची उंची कमी करण्याची सूचना अनेक वेळा पालिकेने केली आहे़मूर्तिकारांना अद्याप मंडपासाठी परवानगी देण्यात आलेली नाही़ यावर चर्चा करण्यासाठी पालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक आज बोलाविली होती़ या बैठकीत पालिका प्रशासनाने मूर्तीची उंची कमी करण्याचा प्रस्ताव मंडळांसमोर मांडला़ मात्र मंडळांनी हा प्रस्ताव नाकारला असून कोणत्याही परिस्थितीत मूर्तीची उंची कमी करण्यास नकार दिला आहे़ (प्रतिनिधी)२००७ मध्ये तत्कालीन महापौर डॉ़ शुभा राऊळ यांनी गणेशमूर्तींची उंची कमी करण्याची सूचना केली होती़ मात्र यावर मंडळांकडून तीव्र पडसाद उमटताच हे महापौरांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत शिवसेनेने त्यांना एकटे पाडले होते़मूर्तीची उंची कमी करण्याबाबत पालिका सांगते़ मात्र ही उंची किती असावी, याबाबत अद्याप काही निश्चित करण्यात आलेले नाही़ मंडपही उंच उभारावा लागत असल्याने त्यानुसारच सार्वजनिक मंडळ मूर्ती तयार करून घेत असतात, असे महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत यांनी सांगितले़काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गणेशमूर्तींना अपघात झाला होता़ या अप्रिय घटनेनंतर मूर्तींची उंची कमी करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला़ १८ फुटांपर्यंतच मूर्तीची उंची असावी, असा आग्रह धरला जातो़ मात्र अनेक मंडळे २४ ते २७ फुटांपर्यंत मूर्ती तयार करून घेतात़
गणेशमूर्तींची उंची मोठीच हवी
By admin | Updated: June 15, 2016 02:38 IST