Join us

गणेशोत्सवाच्या पार्श्वूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १४ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

By मनीषा म्हात्रे | Updated: September 18, 2023 22:40 IST

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशिल ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसीटिव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने वॉच ठेवला आहे.  मुंबईत बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी १५ पोलीस उपायुक्त, २ हजार २४ एसीपी आणि अधिकारी वर्गासह ११ हजार ७२६ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सज्ज आहे. 

लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या मुंबईतील प्रख्यात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसेच, प्रतिष्ठीत व्यक्तीही या राजांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्ताची आखणी करत शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव काळात खरेदीसाठी बाजारपेठाही गजबजलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदनशील ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक, शिघ्रकृती दल, फोर्सवन, होमगार्ड, प्रशिक्षणार्थी आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात येणार आहे. 

   मुंबईत जवळपास पाच हजार सीसीटिव्ही च्या मदतीने पोलीस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.  संशयित lनाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. गणेशभक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांना काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.