Join us

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आज मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:38 IST

हवामान विभागाचा पावसाचा इशारा; कोकण पट्ट्यातही बरसणार

मुंबई : मुंबई शहर, उपनगराला शनिवारी सकाळसह दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र, हा पाऊस तुरळक ठिकाणी थांबून थांबून कोसळत असल्याने, मुंबईकरांना त्याचा मोठा फटका बसला नाही. शहराच्या तुलेनत उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र होते. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ७ जुलैला रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकणी अति मुसळधार पाऊस पडेल, तर मुंबई, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

७ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडेल. ८ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार, तर रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १२ ते १८ जुलै दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होईल. पुढच्या चार दिवसांत कोकण पट्ट्यातही चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान, शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाऊस विश्रांतीवर होता. मात्र त्यानंतर पूर्व उपनगरावर ढग दाटून आले आणि पाऊस सुरू झाला. त्यानंतर तब्बल अर्धा ते पाऊण तास उपनगरात पावसाचा धिंगाणा सुरू होता.

४४ ठिकाणी कोसळल्या झाडाच्या फांद्यापावसामुळे ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला, तर १२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ४४ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. येत्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.