Join us  

राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 5:52 AM

उन्हाबरोबर अवकाळीचीही शक्यता

मुंबई/पुणे : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६, तर ठाण्याचे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. रविवारी कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असून, तापमान ३८ ते ४० अंशाच्या घरात राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात आतापर्यंत १८४ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी १४३ रुग्ण गेल्या २२ दिवसांमध्ये वाढले आहेत. पुण्यातही उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. याआधी १ मार्च ते ४ एप्रिलदरम्यानराज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ४१ होती. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे २६ एप्रिलपर्यंत ही रुग्णसंख्या १४३ ने वाढून १८४ वर गेली. यापैकी सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळले आहेत. त्या खालोखाल ठाणे (१९), नाशिक (१७), वर्धा (१६), बुलढाणा (१५) तर सातारा येथे १४ रुग्णांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ही संख्या १३ च्या खालोखाल आहे.

उन्हामुळे वाढला आरोग्याचा त्रास ?

वाढत्या उन्हामुळे आरोग्यविषयक अनेक तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने डोके दुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी प्रमाणात येणे, पिवळी लघवी येणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे या प्रकारचा त्रास अनेकांना होत आहेत. याप्रकारची लक्षणे तीव्र स्वरुपात जाणविल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा व उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात १ मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.आतापर्यंत १८४ रुग्णांची नोंद झाली असून, एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉ.राधाकिशन पवार, सहसंचालक आरोग्य विभाग

वाशिम ४३ अंशांवर

पारा चाळिशी पारः वाशिम ४३ अंशांवर रविवारी कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असून, तापमान ३८ ते ४० अंशाच्या घरात राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

कमाल तापमान

वाशिम  -४३चंद्रपूर- ४२.८नांदेड-४२.४गडचिरोली-४२सोलापूर-४२मालेगाव-४२धाराशिव-४१.८यवतमाळ-४१.७परभणी-४१.५अकोला-४१.४वर्धा-४१.४ठाणे-४१.३जळगाव-४०.२सांगली-४०.५नाशिक-४०.१मुंबई-३६.६

टॅग्स :तापमान