Join us  

वातावरणातील ‘ताप’दायक बदलाने मुंबईकर घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 5:29 AM

आॅक्टोबर हीटने होरपळून निघालेले मुंबईकर आता थंडीची आवर्जून वाट पाहत आहेत.

मुंबई : आॅक्टोबर हीटने होरपळून निघालेले मुंबईकर आता थंडीची आवर्जून वाट पाहत आहेत. मात्र जोपर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहत नाहीत आणि जोवर कमाल तापमानात घट होत नाही, तोवर तरी थंडी दूरच आहे. या कारणास्तव सध्या हवामानातील ‘ताप’दायक बदल मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले आहेत. रविवारी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेत ३३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असली तरी तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे मुंबईकर त्रस्तच आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व कोकण गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.२२ आॅक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २३ ते २५ आॅक्टोबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २२ आणि २३ आॅक्टोबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंशांच्या आसपास राहील, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.>तापमान वाढलेकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

टॅग्स :उष्माघात