Join us  

राम प्रधान यांच्या निधनाने मनस्वी दु:ख, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 4:56 PM

माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले. आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली.

मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव आर.डी. प्रधान यांचे निधन झाले, ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिग्गज राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृह सचिव, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल अशा विविध भूमिका त्यांनी बजावल्या.आसाम-मिझोराम करारात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तर, ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंबाज शांतता करार पार पाडण्यातही त्यांचं मोठं योगदान असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय. शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरन प्रधान यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले. आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. शवंतराव चव्हाण साहेबांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विलक्षण बुद्धिमत्ता, कार्यतत्परता आणि सचोटी या गुणांमुळे राम प्रधान प्रशासकीय क्षेत्रात अग्रभागी होते. विवादास्पद परिस्थितीत तोडगा काढण्यात, सामंजस्य घडवून आणण्यात प्रधान यांचा हातखंडा होता.  ऑपरेशन ब्ल्यु स्टार पश्चात पंजाब समस्या अतिशय संयमाने, संवेदनशीलतेने व अभ्यासपूर्वक हाताळण्याचे मोठे कार्य राम प्रधान यांनी केले. अकाली दलाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी माझे योगदान घ्यावे म्हणून राम प्रधान यांनीच स्व. राजीव गांधींना गळ घातली होती. त्यावेळी मी राज्यात विरोधी बाकावर होतो. परंतु राजीव गांधींनी प्रधानांचा हा सल्ला मानला. प्रधानांची मुत्सद्देगिरी आणि राजीवजींची परिपक्वता याचा परिपाक असा की, पंजाब शांतता कराराची बोलणी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. कालांतराने सर्वांच्या प्रयत्नाने पंजाब शांतता करार झाला. याचे श्रेय निश्चित राम प्रधानांना जाते, असे पवार यांनी म्हटले. 

यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपली. यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपल्याचेही पवार यांनी सांगितले.  

दरम्यान, कॅबिनेटमंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासन सेवेत त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याची आठवणही सांगितली. 

टॅग्स :शरद पवारगृह मंत्रालयपंजाब