Join us

‘हृदय’ची आर्त हाक अखेरची ठरली

By admin | Updated: January 10, 2016 01:38 IST

‘बाबा जाऊ नकोस ना... थांब ना...’ ही अडीच वर्षांच्या हृदयची आर्त हाक अखेरची ठरली आहे. ही सुन्न करणारी व्यथा आहे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणीचा जीव

- मनीषा म्हात्रे,  मुंबई‘बाबा जाऊ नकोस ना... थांब ना...’ ही अडीच वर्षांच्या हृदयची आर्त हाक अखेरची ठरली आहे. ही सुन्न करणारी व्यथा आहे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणीचा जीव वाचवणाऱ्या रमेश वळुंजच्या चिमुरड्या ‘हृदय’ नावाच्या मुलाची.बॅण्डस्टॅण्ड येथील जाफर बाबा कॉलनी परिसरात वळुंज कुटुंब वास्तव्यास आहे. ३५वर्षीय रमेशची पत्नी कल्पना आणि मुली रविना, मनश्री आणि अडीच वर्षांचा हृदय असे कुटुंब. रमेश खासगी वाहनचालक म्हणून काम करत होता. अवघ्या १० हजारांच्या तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा खर्च भागवत होता. शनिवारी सकाळी मालकाचा फोन आला आणि मालकाने रमेशला ११.३० वाजेपर्यंत कामावर येण्यास सांगितले. बाहेर पडणार तोच हृदयने ‘बाबा, जाऊ नकोस ना...’ अशी हाक दिली व घट्ट मिठी मारली. रमेश बाहेर जायचा प्रयत्न करत असताना हृदयचा हट्ट सुरूच होता. अखेर त्याला चकवा देत रमेश घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. पोराची हाक ऐकून थांबले असते तर ते वाचले असते, एवढीच प्रतिक्रिया पत्नी कल्पना यांनी दिली.नातेवाइकांनी शोध सुरू केलाशनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास अग्निशमन दलाकडून बचावकार्य थांबविण्यात आल्यानंतर नातेवाइकांनी शोधकार्यास सुरुवात केली. रात्री ८ पासून त्यांनी त्यांच्या चार ते पाच बोटी पाण्यात उतरविल्या आणि रमेशचा शोध सुरू केला आहे, असे रमेशचे मामा सुरेश सावंत यांनी सांगितले.मुलाच्या वाढदिवसाची तयारी ७ एप्रिल रोजी हृदयचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी रमेशने स्वप्न रंगवले होते. मात्र ते ‘स्वप्न’ स्वप्नच राहील, असे वाटले नव्हते, असे रमेशची बहीण जयश्रीने सांगितले.आधार हरपला : नेहमी सर्वांच्या मदतीसाठी धावणारा अशी रमेशची ओळख होती. चाळीतल्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात तो सहभागी होत असे. कुटुंबाचा आधारच हरपल्याचे सांगताना जयश्रीला रडू कोसळले.