नवी मुंबई : विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या (नयना) विकासासाठी ‘सिडको’ने तयार केलेल्या पायलट प्रोजेक्टवर आलेल्या हरकती व सूचनांवर २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर विकासाच्या या प्रारूप आराखड्यात सुधारणा करण्यात येईल आणि अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविण्यात येईल.विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यांतील ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने ‘सिडको’ची नियुक्ती केली आहे. यात एकूण २७३ गावांचा समावेश आहे. यापैकी २३ गावांसाठी सिडकोने विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यावर १३ आॅगस्ट २०१४ रोजी सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी ११ सप्टेंबर २0१४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र जनतेच्या विनंतीनुसार यात वाढ करून ती १० आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. या कालावधीत सिडकोकडे तीन हजार ९४६ सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे. बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘नयना’ प्रकल्पाच्या हरकतींवर २७ पासून सुनावणी
By admin | Updated: November 21, 2014 01:18 IST