Join us  

माहिती गोळा करणाऱ्या शिक्षकांच्या आरोग्याची काळजी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 6:13 PM

शिक्षकांना ही संरक्षण साहित्य व विमा संरक्षण देण्याची मागणी

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून डॉक्टर, नर्सेस व पोलिसांसोबत या सगळ्या परिस्थितीची माहिती व लेखाजोखा ठेवण्यासाठी आता शिक्षकहि मैदानात उतरले आहेत. कोरोना सहाय्यता कक्ष,कोरोना संशयितांच्या नोंदी, स्थलांतरित नागरिकांची नोंदणी, सर्वेक्षण अशा कामात शिक्षकांची मदत घेतली जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर , नर्सेस आणि पोलिसांप्रमाणेच शिक्षकांनाही सरंक्षण साहित्य आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली आहे.कोरोना प्रतिबंध व त्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलीस व इतर कर्मचारी यांना शासनाने ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले आहे. तसेच अंगणवाडी ताई,आशा ताई यांना २५ लाखाचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. पण याच कार्यामध्ये राज्यातील जिल्हाधिकारी व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका तसेच खाजगी शाळेतील शिक्षकही कोरोना सर्वक्षण, कोरोना सहायता कक्ष, पोलिस मित्र, संशयीत रुग्ण नोंदणी, स्थलांतरीत नागरिकांची नोंदणी,व व्यवस्थापन करण्याचे काम त्या त्या स्तरावर करत आहेत. परंतु जिल्हा स्तरावरुन किंवा राज्यस्तरावरुन या शिक्षकांना कसल्याही प्रकारच्या संरक्षण साहीत्य व सुविधा पुरविल्या जात नाहीत.  या शिक्षकांच्या आरोग्याची कोणतीच काळजी प्रशासनाने घेतलेली नाही, तसेच शिक्षकांना कोणतेच  विमा संरक्षण ही दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर यांचाही विचार सरकारने करावा अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे संतोष पिट्टलवाड यांनी केली आहे.शिक्षकही समाजासाठी कार्यरत आहेत, त्यांच्या ही कुटुंबाचा विचार आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी. वेळेतच संरक्षणाची काळजी न घेतल्यास या कार्यात कार्यरत शिक्षकांनाही संसर्ग होण्याची शक्यता टाळता येणार नाही. यासाठी वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत संतोष पिट्टलवाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या