Join us  

CoronaVirus News : कायम विनाअनुदानित शाळांसाठी लढणारे मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 5:00 AM

CoronaVirus News : गेली २५ वर्षे अध्ययनाचे काम केल्यानंतर १९९८पासून कांदिवली येथील हिल्डा कॅस्टोरिनो मराठी शाळेचे मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी हाती घेतली होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष आणि मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांचे गुरुवारी संध्याकाळी कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४७ वर्षांचे हाेते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी झटणारे आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

गेली २५ वर्षे अध्ययनाचे काम केल्यानंतर १९९८पासून कांदिवली येथील हिल्डा कॅस्टोरिनो मराठी शाळेचे मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी हाती घेतली होती. कायम विनाअनुदानित शाळांसाठी अनुदानाचा टप्पा मिळवून देण्यासाठी आणि तेथील शिक्षकांसाठी प्रशांत रेडीज गेल्या अनेक वर्षापासून लढा देत होते. कायम विनाअनुदानित शाळांचा कायम हा शब्द काढून त्यांना अनुदानास पात्र ठरवावे यासाठी त्यांनी तब्बल १७ वर्षे लढा दिला. या काळात शेकडो आंदोलनांचे त्यांनी आघाडीवर राहून नेतृत्व केले.

सरकारला कायम विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र ठरविण्याचे निकष जाहीर करून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात रेडीज यांच्या आंदोलनांचा मोलाचा वाटा होता. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे मुख्याध्यापक म्हणून त्यांची शिक्षणक्षेत्रात ओळख होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी ही ते आता लढा देण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने शिक्षकच नव्हे तर शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक यांच्या विविध प्रश्नांसाठी सतत झटणारा एक नेता गमावल्याची भावना मुख्याध्यापक संघटनेने व्यक्त केली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई