Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची डोकेदुखी

By admin | Updated: July 14, 2016 02:25 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्याचे काम मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय करत आहे.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्याचे काम मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय करत आहे. मात्र, आॅनलाइनमधील काही जाचक अटींचा त्रास होत असल्याने, बुधवारी शेकडो विद्यार्थी-पालकांनी उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, सर्व प्रक्रिया सॉफ्टवेअरमार्फत राबविली जात असल्याने, येथील अधिकारी हतबल झाल्याचे दिसले, तर अशा किचकट प्रक्रियेहून आॅफलाइन प्रवेश प्रक्रियाच बरी, अशा प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या मंगळवारी लागलेल्या तिसऱ्या यादीनंतर प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून पसंतीक्रम अर्ज भरताना झालेल्या काही क्षुल्लक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना आयुष्यभरासाठी सहन करावा लागणार आहे. दहिसरला राहणाऱ्या विद्यार्थिनीला माटुंगा येथील महाविद्यालय लागल्याचे पालक सांगत होते. पालकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, नजीकच्या महाविद्यालयांना पसंतीक्रम दिला असतानाही, अगदी शेवटचा पसंतीक्रम दर्शवलेल्या माटुंगा येथील पोद्दार महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागला. एकट्या मुलीने इतक्या दुरून दोन गाड्या बदलून कसे यायचे, याची चिंता आहे. मुळात पश्चिम उपनगरांतील बहुतेक महाविद्यालयांना पसंती दिलेली असतानाही सॉफ्टवेअरमुळे या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला.कांंदिवली आणि बोरीवली येथील नामांकित महाविद्यालयांत सर्रासपणे इंटिग्रेटेड कोर्सेस सुरू असल्याची माहिती एका पालिकाने नाव न सांगण्याची अटीवर दिली. मुलीला संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेची थिअरी शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसून, केवळ प्रॅक्टिकल शिकवले जाईल, असे प्रशासन सर्रास सांगत आहे. शिवाय थिअरीसाठी एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेण्याची सूचना महाविद्यालयच देत असल्याची धक्कादायक बाब या वेळी समोर आली आहे. (प्रतिनिधी)१८ जुलैनंतर चित्र स्पष्ट होईलप्रशासनाने तिसऱ्या यादीनंतर शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैला चौथी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पसंतीक्रम अर्ज चुकीचा किंवा अर्धवट भरलेल्या विद्यार्थ्यांबाबत त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित मिळेल, अशी खात्रीही या कार्यालयाने दिली.