Join us  

त्याने शरीरात लपवले होते ६ कोटींचे कोकेन

By मनोज गडनीस | Published: January 19, 2024 11:24 PM

Mumbai News: शरीरामध्ये तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे.

- मनोज गडनीसमुंबई - शरीरामध्ये तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. तो व्हेनिझुएला देशाचा नागरिक असून अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाच्या अनुमतीने त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.डीआरआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनिझुएला येथून एक व्यक्ती अंमली पदार्थांची तस्करी करत ते मुंबईत आणत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ती व्यक्ती मुंबईत येत असलेल्या विमानाच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. विमानातून उतरलेल्या एका व्यक्तीचा हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याला बाजूला घेण्यात आले. सर्वप्रथम त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यात अंमली पदार्थ आढळून आले नाही. मात्र, चौकशी दरम्यान त्याने स्वतःच्या शरीरात कोकेनच्या ५७ कॅप्सूल लपविल्या असल्याची कबुली दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनचे वजन ६२८ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. अटक केलेली व्यक्ती केवळ हँडलर आहे की त्याच्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे तसेच मुंबईत तो हे कोकेन कुणाला देणार होता, याचा तपास आता अधिकारी करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई