Join us  

रुग्णसेवा देणाऱ्या अपघातग्रस्त रिक्षाचालकाला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 5:57 PM

कोविड योध्दा म्हणून सन्मान करून, घर खर्चासाठी केली आर्थिक मदत

मुंबई : मालाड (पूर्व) येथील तानाजीनगर येथे राहणारे रिक्षाचालक संजय धूमक सामाजिक जाणिवेतून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून, कोरोना काळापासून रुग्णसेवा करत होते. 

धूमक यांच्या घरी आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पूर्वी धुमक हे एका कंपनीमध्ये काम करत होते, पण त्या ठिकाणी पगार पगार वेळेवर न मिळणे, कमीजास्त मिळणे याने त्रस्त  होऊन, कर्ज काढून रिक्षा घेतली. रिक्षावर त्यांचे घर चालते. परंतु कोरोनाकाळात सामाजिक जाणिवेच्या भावनेतून, जीवाची तमा न बाळगता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी रिक्षा चालवली. यामध्ये चार कोरोना रुग्णांनाही त्यांनी रुग्णालयात पोहोचवले होते. दुर्दैवाने एका रुग्णाला नानावटी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा अपघात झाला, त्यामध्ये त्यांच्या हाताची मुख्य नस कापली गेली. त्यामध्ये त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातात हाताची मुख्य नस जायबंदी झाल्याने त्यांना वर्षभर रिक्षा चालवता येणार नाही. रोजीरोटी अवलंबून असलेला रिक्षा व्यवसाय पुढील एक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी बंद झाल्याने कुटुंब कसे पोसायचे हा प्रश्न धूमक यांना पडला होता

दैनिक लोकमतच्या दि,1 सप्टेंबरच्या अंकात "रुग्णसेवा करणाऱ्या रिक्षा चालकाला अपघात "वर्षभर विश्रांतीचा सल्ला : रिक्षा शिवाय संसाराचा गाडा हाकायचा कसा ? या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती. लोकमतच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनिल प्रभु यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रिक्षाचालक धुमक यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पुढील सहा महिन्यांच्या घर खर्चासाठी आर्थिक मदत केली. तसेच संजय धुमक यांनी सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून, रुग्णांना मदतीचा हात देऊ केला व वैश्विक संकटाच्या काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता, इतरांसाठी सहकार्य करून समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवला या करता "कोविड योद्धा" म्हणून देखिल गौरव केला. दस्तुरखुद्द आमदार प्रभू यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला फोन करून सदर शुभवर्तमान वृत्त दिले.

सदर मदतीमुळे सद्गतीत झालेल्या संजय धुमक यांनी आमदार सुनिल प्रभू व लोकमतचे मनःपूर्वक आभार मानले, व कोविड योध्दा म्हणून गौरव झाल्याने या पुढेही अशीच समाजसेवा करण्यासाठी हुरूप आल्याचे सांगितले. यावेळी विधानसभा संघटक विष्णु सावंत, प्रशांत कदम, विधानसभा संघटक रीना सुर्वे, उप विधानसभा संघटक रुचिता आरोसकार, उप विधानसभा समन्वयक कृष्णकांत सुर्वे, शाखा प्रमुख अशोक राणे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :ऑटो रिक्षाकोरोना वायरस बातम्यामुंबई