अलिबाग : जमीन विक्रीतून आलेल्या पैशापैकी आपला हिस्सा दिला नाही, या रागातून आत्या विठाबाई रघुनाथ वाघमारे (४५) यांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वाकस आदिवासी वाडीत घडली. खून केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरल्याचेही यावेळी उघड झाले आहे. याप्रकरणी महिलेचा भाचा संतोष ऊर्फ आंबो पंढरीनाथ मुकणे (२५) याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.२३ मे रोजी वाकस आदिवासी वाडीत घडलेल्या या खुनाची कुणालाही माहिती नव्हती. विठाबाई या वाकस गावातील दत्ता लक्ष्मण मोरे यांच्याकडे रहायला होती. त्या तीन दिवस झाले तरी घरी आल्या नाहीत, म्हणून मोरे यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी नेरळ पोलिसांत तक्रार दाखल केली.नेरळ पोलिसांनी तत्काळ वाकस आदिवासीवाडीवर येवून संतोष यांची चौकशी केली असता प्रथम त्याने काहीही सांगितले नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच संतोषने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक आर.बी. म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.
हिस्सा न दिल्याने भाच्याने केली आत्याची हत्या
By admin | Updated: June 6, 2015 22:28 IST