Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश अर्जाकरिता हजाराचा बाजार

By admin | Updated: January 31, 2015 22:19 IST

खाजगी शाळांकडून शिक्षणाच्या नावाने पालकांची लूट सुरूच आहे. यात नवीन पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कुलने भर घालून प्रवेश अर्जाकरीता एक हजार रूपये घेतले आहेत.

प्रशांत शेडगे ल्ल पनवेलखाजगी शाळांकडून शिक्षणाच्या नावाने पालकांची लूट सुरूच आहे. यात नवीन पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कुलने भर घालून प्रवेश अर्जाकरीता एक हजार रूपये घेतले आहेत. ज्यांना प्रवेश मिळाला नाही, त्या पालकांनी पैसे परत मागितले आहेत, मात्र ते देण्यास शाळा टाळाटाळ करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींना प्रवेश मिळत असल्याने त्यांनीही तोंडावर बोट ठेवले आहे.नवीन पनवेल येथील डिएव्ही पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश मिळावा याकरीता पालक विशेष प्रयत्न करतात. नवीन पनवेलच नाही तर पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोलीतून पालक या ठिकाणी येतात. शाळेच्या प्रसिध्दीमुळे मुलांना याच ठिकाणी प्रवेश मिळाविण्याकरिता अनेकांचा कल असतो. जानेवारी महिन्याच्या दुसया आठवडयात नर्सरी व इतर वर्गाकरीता शाळेने अर्ज वाटले. शाळेच्या नोंदीनुसार तीन दिवसात एकूण ११०७ अर्जाच्या प्रती पालकांना दिल्या, मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त फॉर्म दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याकरीता प्रत्येकाकडून एक हजार रूपये घेण्यात आले. शाळेने केलेल्या दाव्यानुसार १७ जानेवारी रोजी प्रवेशाकरीता पीटीएसचे सदस्य आणि उपस्थित पालकांच्या समक्ष सोडत काढण्यात आली, मात्र त्याकरीता आम्हाला कळविण्यात आले नाही, त्याचबरोबर आतमध्ये प्रवेश करून न दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मागील आठवडयात 228 जणांची प्रवेशयादी शाळेच्या बाहेर लावली. सुमारे आठशेपेक्षा जास्त पालकांच्या पाल्यांना प्रवेश मिळाला नसल्याने शाळेने घेतलेले एक हजार रूपये परत मिळावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे. असे जर प्रत्येक शाळेत पैसे भरत राहिलो, तर कसे होईल असा सवाल शर्वानी देशमुख या पालकाने केला. फीच्या चार्टमध्ये नोंदणी शुल्क एक हजार रुपये असा उल्लेख आहे, मात्र आमच्या मुलांना प्रवेशच मिळाला नसल्याने नोंदणीचा विषयच येत नाही. त्यामुळे शाळेने प्रत्येकाचे पैसे परत केले पाहिजे, अशी मागणी सुमन चौबे यांनी केली आहे. ११०७ अर्जातून शाळेने तब्बल अकरा लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळविली आहे. अशा प्रकारे पालकांची लूट आणि आर्थिक शोषण सुरू असताना शिक्षण विभाग मात्र शांत बसलेला आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही. परिसरातील अन्य शाळांमध्येही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती पहायला मिळत आहे. प्रवेश अर्जाकरिता एवढे शुल्क आकारणे चुकीचे आहे. याबाबत शाळेकडून चौकशी अहवाल मागवण्यात येईल, त्यानुसार पालकांची उर्वरित रक्कम परत देण्यात येईल. - देविदास महाजन,जिल्हा शिक्षणाधिकारी.