Join us

फेरीवाल्यांची भाजी मंडईत घुसखोरी

By admin | Updated: January 5, 2015 22:51 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कृपाशिर्वादामुळे फेरीवाल्यांनी आता तर चकक पालिकेच्याच भाजी मंडईमध्ये घुसखोरी केली आहे.

डोंबिवली: पदपथ ,महत्वाचे चौक आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कृपाशिर्वादामुळे फेरीवाल्यांनी आता तर चकक पालिकेच्याच भाजी मंडईमध्ये घुसखोरी केली आहे.या घुसखोरीबाबत वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने अनधिकृत फेरीवाल्यांना अभय मिळाल्याचे समोर आले आहे.फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.या प्रश्नावर वारंवार महासभेतही लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जातो. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत या विषयावर मनसेचे सदस्य राहुल चितळे यांनी लक्षवेधी मांडून केडीएमसी प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आणला होता.कारवाईची मागणी होऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याप्रकरणी प्रशासनाला सर्वपक्षिय सदस्यांकडून धारेवर धरण्यात आले होते.यावर राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाला सर्वेक्षण आणि नोंदणीची कार्यवाही सुरू असल्याने सद्यस्थितीला कारवाई शक्य नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिले होते.या स्पष्टीकरणाने फेरीवाल्यांना रान मोकळे झाले असताना पालिकेच्याच ग प्रभागातील उर्सेकरवाडीतील भाजी मंडईमध्ये अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. या मंडईतील वाहन पार्किंगच्या जागेतच फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून त्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे मंडईत भाजी घेण्यासाठी येणा-या ग्राहकांची गैरसोय होत आहे.याचा फटका मंडईतील भाजी विक्रेत्यांना देखील बसत असून त्यांनी तक्रारीद्वारे प्रभागातील अधिका-यांचे लक्ष वेधूनही याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. शहराबाहेरच्या फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणावर वारंवार आवाज उठविला जात असताना त्यांना अभय दिले जात असल्याचे भाजी मंडईतील अतिक्रमणावरून दिसून येत आहे. खाद्यपदार्थ बनविण्याच्या गाडया सर्रास सुरू आहेत. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच केडीएमसी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.