मुंबई : लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सध्या फेरीवाले आणि भिकाऱ्यांच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानके व परिसरात तसेच लोकल प्रवासात जागोजाग अनधिकृत फेरीवाले आणि भिकाऱ्यांनी बस्तान बसविल्याने प्रवाशांना प्रवास नकोसा झाला आहे. आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) कारवाई करूनही पुन्हा ‘जैसे थे’च परिस्थिती निर्माण होत असून हा विळखा सुटू का शकत नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. फेरीवाले आणि भिकाऱ्यांवर पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या चार महिन्यांत केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच हजारपेक्षा जास्त प्रकरणांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरही तेवढीच नोंद असून प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाइनचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत, हार्बरचा पनवेल, अंधेरी तर पश्चिम रेल्वेचा चर्चगेटपासून डहाणूपर्यंत विस्तार आहे. या तीनही मार्गांवरून जवळपास ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र त्यांच्या प्रवासात फेरीवाले आणि भिकाऱ्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक व हद्दीत तसेच लोकल प्रवासात त्यांची संख्या प्रचंड वाढली असून आरपीएफकडून कारवाई करूनही त्यांना जुमानत नसल्याचे दिसते. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरीवली, नालासोपारा, विरार तर मध्य रेल्वेच्या सीएसटी, मस्जिद स्थानक, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आाणि हार्बरवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा, गोवंडी, शिवडी या स्थानकांना मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आणि भिकाऱ्यांचा विळखा बसला आहे. आरपीएफकडून या फेरीवाले आणि भिकाऱ्यांवर कारवाई केली जात असून पश्चिम रेल्वे मार्गावर ५ हजार ७९१ प्रकरणांची नोंद मागील चार महिन्यांत झाली आहे. जुलै महिन्यात १,२८९ भिकारी आणि फेरीवाल्यांवर कारवाई झाली. आॅक्टोबर महिन्यात हीच संख्या १,२५0 एवढी असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावरही तेवढ्याच प्रकरणाची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्थानके बनली भिकारी व गर्दुल्ल्यांचे निवारेमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानके ही भिकारी व गर्दुल्ल्यांची निवारे बनली आहेत. रात्री अकरानंतर झोपण्यासाठी भिकारी आणि गर्दुल्ले स्थानकांचा सर्रासपणे वापर करतात. सीएसटी, मस्जिद, दादर, कुर्ला, ठाणे, वांद्रे, अंधेरी, बोरीवली स्थानकांचा असा वापर सर्वात जास्त होताना दिसतो. फेरीवाल्यांनी स्थानक व परिसराला चांगलाच विळखा घातलेला आहे. पादचारी पूल, प्लॅटफॉर्म आणि स्थानक हद्दीत मोठ्या संख्येने फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात. फेरीवाल्यांना हटविण्यात आल्यानंतरही पुन्हा त्याच जागेवर आपले बस्तान बसवितात. त्यामुळे आरपीएफचा धाक त्यांना राहिलेला दिसत नाही. प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी किंवा पादचारी पुलावरून जाताना अडथळा निर्माण झाल्यास आणि प्रवाशांनी त्यांना हटविल्यास फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागते.
फेरीवाले, भिकाऱ्यांनी अडवली प्रवाशांची वाट
By admin | Updated: November 26, 2015 02:21 IST