कल्याण : फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण आणि निष्क्रिय प्रशासन या मुद्यावर बुधवारची केडीएमसीची महासभा चांगलीच गाजली. यासंदर्भात मांडलेल्या तहकूब सूचनेवर सभागृहात तब्बल दोन तास चर्चा झाली. फेरीवालाप्रश्नी सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेऊन ठोस कारवाईची मागणी लावून धरली. यावर फेरीवाला सर्वेक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत कारवाई अशक्य असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिल्याने तहकुबीवर झालेली महाचर्चा एक प्रकारे निष्फळ ठरली आहे. फेरीवाल्यांच्या मुद्यावर सदस्य राहुल चितळे यांनी सभा तहकुबी मांडली होती. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाबाबत वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचे अधिकारी कारवाईकडे कानाडोळा करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणाची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी, फेरीवाल्यांच्या वाढत्या पसाऱ्यामुळे नागरिक आणि प्रसारमाध्यमे यांच्या टीकेला नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कारवाईकामी विशेष पथक नेमण्यात यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. डोंबिवलीप्रमाणे कल्याणमध्येही तीच परिस्थिती असून फेरीवालाविरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कारवाईऐवजी केवळ वसूली सुरू असल्याचा आरोप सदस्य अरविंद पोटे यांनी या वेळी केला. एमएमआरडीएकडून नुकताच ताबा मिळालेल्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवरही मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याकडे सदस्य श्रेयस समेळ, प्रमोद पिंगळे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांवरुन प्रशासन धारेवर
By admin | Updated: December 25, 2014 00:12 IST