मुंबई : ओशिवरा नदीतील अतिक्रमणावर पालिकेचा अखेर हातोडा पडला. ‘ओशिवराची झाली गटारगंगा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये हे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध झाले होते. त्याचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात आणि गोरेगावकरांमध्ये उमटले. त्यानंतर लगेचच ओशिवरा नदीतील अतिक्रमणावर पालिका कारवाई करेल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली होती. त्यानुसार कारवाई करीत पालिकेने भगतसिंग नगर आणि नयानगर येथील सुमारे ६८ अनधिकृत झोपड्यांवर सोमवारी कारवाई केली. झोपड्यांवर पालिकेने हातोडा चालवल्याच्या वृत्ताला पी (दक्षिण) विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिराजदार यांनी दुजोरा दिला. ओशिवरा नदी पात्रातील अतिक्रमणे तोडण्याचे काम खरे तर जिल्हाधिकारी (उपनगरे) यांच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे आहे. परंतु, तातडीची बाब म्हणून आणि पावसाळ्यापूर्वी पालिकेतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून झोपड्यांवर कारवाई केली जाते, अशी माहितीही बिराजदार यांनी दिली. प्रभाग समितीच्या अध्यक्षा प्रमिला शिंदे यांनी ओशिवरा नदीतील अतिक्रमणाची गेल्या आठवड्यात पाहणी केली होती. पावसाळ्यात गोरेगावमध्ये पूरपरिस्थिती उद्भवू नये, म्हणून ओशिवरा नदीतील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
ओशिवरा नदीतील अतिक्रमणावर हातोडा!
By admin | Updated: May 13, 2015 00:46 IST