Join us  

NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 9:07 PM

Atul Bhatkhalkar arise question on Nawab Malik : कार्डीलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांसह अटक केली होती.

ठळक मुद्देनशा माफियांसमोर लोटांगण घालण्याची हीच परंपरा जारी ठेवत आणि एक पाऊल पुढे टाकत मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर आरोप करून ड्रग्जवाल्यांची तळी उचलेली आहे.

लॉकडाऊनमध्ये ठाकरे सरकारने सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णयही याच सरकारचा. नशा माफियांसमोर लोटांगण घालण्याची हीच परंपरा जारी ठेवत आणि एक पाऊल पुढे टाकत मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर आरोप करून ड्रग्जवाल्यांची तळी उचलेली आहे.

कार्डीलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांसह अटक केली होती. मलिक यांनी आज एक पत्रकार परीषद घेऊन या कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले आहे. आर्यन खान यांचे वकीलपत्र दिग्गज कायदेतज्ज्ञ सतीश मानेशिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी बचावासाठी युक्तिवाद केल्यानंतरही न्यायालयाने NCB ला आर्यन खानची कोठडी दिली याचे कारण त्याच्याविरुद्ध असलेले ठोस पुरावे होय. जर पुरावे नसते तर त्याला तात्काळ जामीन मिळाला असता. मलिक यांचे आरोप न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. ‘आपला जावई साडे आठ महीने तुरुंगात होता, त्यावेळी मी त्याप्रकरणावर भाष्य केले नाही कारण माझे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे’, असे साळसूद उद्गार काढणाऱ्या मलिकना ठोस पुरावे असल्यामुळेच न्यायालयाने आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीचे आदेश दिले याचा विसर पडलेला दिसतो.ज्या क्रूझवर NCB ने कारवाई केली तिथे कित्येक लोक होते. त्यापैकी कुणी तरी आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीचे मलिक यांनी विनाकारण भांडवल करू नये.  तिथे उपस्थित असलेल्यांपैकी ज्यांचा संबंध नाही त्यांना NCB ने हातही लावला नाही. रेव्ह पार्टीशी संबंधित नसलेल्या व्यक्ति कोणत्या पक्षाच्या होत्या की नव्हत्या त्याची चर्चा कशाला. ठाकरे सरकारला वाटत असेल तर त्यांची चौकशी करावी. संबंध होता त्यापैकी आठ जणांना ताब्यात घेतले आणि त्यातही फक्त तिघांना अटक केली हे लक्षात घ्यावे.

मला जे करता आले नाही ते सर्व माझ्या मुलाने करावे, त्याने सेक्स करावे, ड्रग्ज घ्यावे असे शाहरुखनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्याचा मुलगा तेच करताना पकडला गेला आहे. जे झाले त्याबद्दल शाहरुख मूग गिळून बसला असताना मलिक त्याच्यासाठी कशाला बॅटींग करतायत. ड्रग्जच्या कारभारात असलेल्या जावयाच्या सांगण्यावरून त्यांनी NCB वर निशाणा साधलाय का? की अन्य ड्रग्ज माफीयांनी NCB ला बदनाम करण्यासाठी त्यांना सुपारी दिली आहे हे मलिक यांनी स्पष्ट करावे.

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थनवाब मलिकअतुल भातखळकर