Join us

‘मुख्यमंत्र्यांनी कधी गाय पाळली आहे का?’

By admin | Updated: May 6, 2015 02:12 IST

‘गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधी गाय पाळली आहे का?’ असा सवाल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई : ‘गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधी गाय पाळली आहे का?’ असा सवाल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही विचार न करता सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा तयार केल्याचा आरोपही त्यांनी मंगळवारी कृती समितीने काढलेल्या मोर्चादरम्यान केला आहे.गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात कामगार, शेतकरी, कुरेशी समाज आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांसह आमदार वारिस पठाण यांना ताब्यात घेतले. राणीबागहून निघालेल्या मोर्चाचे रुपांतर आझाद मैदानात जाहीर सभेत झाले.प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे घेऊन घुसतील, असा इशारा सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी यांनी सभेत दिला. यावेळी रेड्डी म्हणाले की, आंदोलनाची सुरूवात लवकरच होईल. ४० हजार रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकरी त्याचे भाकड जनावर जिल्हाधिकाऱ्याला विकेल. मिळालेल्या पैशांतून त्याला शेतीसाठी उपयोगी नवीन जनावर खरेदी करता येईल. शासनाकडे शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नसतील, तर गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याची मागणी रेड्डी यांनी केलीआहे. (प्रतिनिधी)