Join us  

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 9:51 AM

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमन्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 

मुंबई: चेंबुर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी साधारण पावणे सातच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वाशीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. सध्या हार्बर मार्गावरील लोकल साधारण अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्यावेळीच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टनेही जादा बसेस न सोडल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेलोकल