मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मेगाब्लॉक होत असतानाच हार्बरवर कुर्ला ते सीएसटी आणि वडाळा रोड ते माहीमदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. तब्बल पाच तास असणाऱ्या ब्लॉकमुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मोठा गोंधळ झाला. हार्बरवर कुर्ला ते सीएसटी अप आणि वडाळा रोड ते माहीमदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. सीएसटी ते बांद्रे, अंधेरी मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत घेतलेल्या ब्लॉकमुळे हार्बरवासीयांना मन:स्ताप झाला. कुर्ला ते सीएसटीदरम्यान मेन लाइनवरून लोकल सुरू ठेवण्यात आली. सायन, माटुंगा, दादर आणि परेल तसेच भायखळा स्थानकांत हार्बरचा लोकल गाड्यांना थांबा देण्यात येत होता. त्यामुळे हार्बर आणि मेन लाइनवरील प्रवाशांना लोकल पकडताना मोठ्या गोेंधळाला सामोरे जावे लागत होते. पश्चिम रेल्वेवर सांताकू्रझ ते गोरेगावदरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक घेतल्यामुळे या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या. या मार्गावरही लोकल पकडताना प्रवाशांचा गोंधळ उडत होता. अनेक प्रवासी धीम्याऐवजी जलद लोकल किंवा जलद लोकलऐवजी धीमी लोकल पकडत असल्यामुळे प्रवाशांना पुन्हा परतीच्या प्रवासासाठी दुसरी लोकल पकडावी लागत होती. (प्रतिनिधी)
हार्बर, प. रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे गोंधळ
By admin | Updated: August 4, 2014 00:30 IST