Join us  

मुंबईत हापूसच्या पेट्यांची आवक; पण ग्राहकांनी फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 6:13 AM

गतवर्षीच्या तुलनेमध्ये बाजारभाव घसरले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी कोकणातून हापूसच्या ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. परंतु कोरोनामुळे ग्राहक नसल्याने योग्य भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गतवर्षी ५ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपयांना विकली जात होती. यंदा मात्र ८00 ते २ हजार रुपयांना विकावी लागत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसला आहे. पावसाळा वाढल्यामुळे आंब्याला उशीरा मोहर आला. मार्केटमध्ये आंबा येण्यास सुरवात झाली असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे निर्यात बंद झाली व देशांतर्गत मार्केटवरील विक्रीवरही परिणाम झाला आहे. झाडावरच आंबा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. शासनाने आंबा हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून निर्यातीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मुंबईमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. सोमवारी मुंबई बाजारसमितीमध्ये ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. परंतु मुंबई व नवी मुंबईमधील अनेक फळ विक्रेत्यांची दुकाने बंद आहे. हजारो नागरिक गावी गेले आहेत.

कोरोनामुळे हापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोमवारी एपीएमसीमध्ये तब्बल ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अपेक्षीत बाजारभाव मिळत नाही.- संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजारसमिती

टॅग्स :आंबा