Join us  

बेळगावात 'असा' झाला गनिमी कावा, राज्यमंत्र्यांचा बस अन् टमटमनं प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:35 PM

गनिमी कावा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्या शत्रूंच्या बालेकिल्ल्यात घुसत असत

मुंबई - सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे बेळगावसह सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, बेळगावात जाण्यापूर्वी राज्यमंत्री येड्रावकर यांनी चक्क बस अन् ऑटो रिक्षातून प्रवास केला. गनिमी कावा करत येड्रावकर यांनी हुतात्म्यांना आंदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेले समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश वाचून दाखवला. 

गनिमी कावा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्या शत्रूंच्या बालेकिल्ल्यात घुसत असत. शुक्रवारी राज्यमंत्री येड्रावकर यांनीही गनिमी कावा करत आणि पोलिसांचे जाळे भेदून बेळगावात प्रवेश केला. बेळगावला जाण्यासाठी येड्रावकर यांनी सर्वप्रथम कोल्हापूर ते कागल टोलनाका असा खाजगी वाहनाने प्रवास केला. त्यावेळी, कागल टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैना होता. त्यामुळे, कागल टोल नाक्यावरील पोलीस बंदोबस्त पाहून येड्रावकर यांनी खासगी वाहनाला सोडून चक्क एसटी महामंडळाच्या बसने संकेश्वरपर्यंत प्रवास केला. मात्र, पोलिसांकडून महाराष्ट्रातील एसटी बसचीही तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे, राज्यमंत्र्यांनी संकेश्वर येथून कर्नाटक (KSRTC) च्या बसमधून बेळगावमधील (KLE हॉस्पिटलपर्यंत) प्रवास केला. बेळगावात पोहोचल्यानंतरच पोलिसांकडून अडवणूक करण्याची सर्वाधिक शक्यता होती. त्यामुळे, बेळगावात गेल्यानंतर आदरांजली स्थळ असलेल्या हुतात्मा चौकापर्यंत पोहोचण्यासाठी येड्रावकर यांनी चक्क 6 आसनी टमटम रिक्षातून प्रवास केला. येथील हुतात्मा चौकात त्यांनी हुतात्म्यांना श्रंद्दाजली अर्पण केली. 

शिवेसेना नेते आणि राज्यमंत्री येड्रावकर यांच्या गनिमी काव्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 1986 साली बेळगाव आंदोलनाची आठवण झाली. अनेकांनी शरद पवारांच्या आंदोलनाची आठवत सांगत, येड्रावकर यांच्या यशस्वी ठरलेल्या गनिमी काव्याचं कौतुक केलं.  

दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी येड्रावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ते आज बेळगावात पोहोचले आहेत. आपल्या देशात पाकिस्तानी घुसू शकतात, बांग्लादेशी घुसू शकतात, रोहिंग्या घुसू शकतात, मात्र महाराष्ट्रातून कोणी बेळगावला जाऊ शकत नाही हे चुकीचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. 17 जानेवारी 1956 यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. 

दरम्यान, बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. त्यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. 

टॅग्स :बेळगावशिवसेनामंत्रीऑटो रिक्षा