Join us

हनुमान जयंतीला ‘खग्रास चंद्रग्रहण’

By admin | Updated: March 31, 2015 01:53 IST

४ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे त्या दिवशी असणाऱ्या पूजा दुसऱ्या दिवशी पार पडतील. तब्बल १५ वर्षांनी हनुमान जयंतीच्या दिवशी ग्रहण आले आहे.

मुंबई : ४ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे त्या दिवशी असणाऱ्या पूजा दुसऱ्या दिवशी पार पडतील. तब्बल १५ वर्षांनी हनुमान जयंतीच्या दिवशी ग्रहण आले आहे. हे खग्रास चंद्रग्रहण मुंबईसह भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. मुंबईत चंद्रोदय सायंकाळी ६ वाजून पन्नास मिनिटांनी होणार असून पुढे ७.१५ वाजेपर्यंत हे ग्रहण खंडग्रास स्थितीत पाहता येणार आहे. ग्रहणापूर्वी वेध सुरू होत असल्याने धार्मिक विधी होत नाहीत, मंदिरांमध्येही या प्रथा पाळल्या जातात. त्यामुळे पूजा रद्द होऊन दुसऱ्या दिवशी होतील, असे आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले.या दिवशी भारतातून ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. भारतात जेथे सायंकाळी सव्वासात वाजण्यापूर्वी चंद्रोदय होतो त्या त्या ठिकाणी चंद्रोदय झाल्याच्या वेळेपासून पुढे सव्वासात वाजेपर्यंत हे ग्रहण ग्रस्तोदित खंडग्रास स्थितीमध्ये चंद्रोदयापासून काही काळ पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारी ३.४५ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत होणार असून खग्रास स्थिती सायंकाळी ५.२४ ते ५.३६ या वेळेत असेल. परंतु त्या वेळी आपल्या येथे चंद्र आकाशात नसल्याने ते दृश्य भारतात पाहायला मिळणार नाही. भारतात साध्या डोळ्यांनीही हे ग्रहण पाहता येईल.