Join us
Daily Top 2Weekly Top 5

हँकॉक पुलावर पडणार हातोडा

By admin | Updated: November 14, 2015 02:46 IST

सॅन्डहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकदरम्यान असलेल्या हँकॉक पुलावर अखेर रेल्वेकडून हातोडा पडणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले

मुंबई : सॅन्डहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकदरम्यान असलेल्या हँकॉक पुलावर अखेर रेल्वेकडून हातोडा पडणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, पादचारी आणि वाहतुकीसाठी तो बंद केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या कामामुळे सध्यातरी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. ब्रिटिश काळातील या हँकॉक पुलाला १३५ वर्षे उलटून गेली आहेत. या पुलाने धोकादायक रेषा ओलांडली असून, तो तोडून त्याऐवजी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर १,५00 व्होल्टचे २५,000 व्होल्टमध्ये परावर्तन करण्यात आले आहे. या पुलाची उंची आणि ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंची कमी असल्याने पुलाखालून जाताना रेल्वे गाड्यांना वेगमर्यादाही लागली आहे. त्यामुळे या पुलाची उंचीही वाढवण्यात येणार आहे. या कामाला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सुरुवातीच्या कामामुळे रेल्वेच्या सेवांवर कोणतेही परिणाम होणार नाही. मात्र नंतर मोठे काम केले जाणार असून, त्यासाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक घेताना मध्य रेल्वे मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार असून मेन लाईन भायखळापासून तर हार्बर सेवा कुर्ला तसेच वडाळापासून सुरू ठेवली जाणार आहे. १८ नोव्हेंबरपासून हा पुल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले. पालिका आणि मध्य रेल्वेकडून पुलाचे काम केले जाणार असून पालिकेकडून कामाला सुरुवातही झाली आहे.