Join us

'विकासकाच्या फायद्यासाठी गरिबांच्या घरावर हातोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:52 IST

विजय वडेट्टीवार; विकासकाकडून दमदाटी

मुंबई : महानगरपालिकेने बिल्डरच्या फायद्यासाठी साकीनाका भागातील साईनाथ सोसायटीत ४० वर्षांपासून राहत असलेल्या लोकांच्या घरांवर हातोडा चालवून त्यांना बेघर केले आहे. महानगरपालिकेने केलेली ही कारवाई अन्यायी व नियमबाह्य असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

साईनाथ सोसायटीला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि उपनेते नसीम खान यांनी भेट दिली व स्थानिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, साकीनाका परिसरातील मोईली व्हिलेज या परिसरातील झोपडपट्टीवासीयांना ‘पुनर्विकासाचा करार करा, नाही तर घरे खाली करा’ अशा आशयाची धमकीवजा नोटीस दिली जात आहे. मोहिली भागातील या सोसायटीत ८०० घरे असून त्याला झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या डीपीनुसार हा हरितपट्टा आहे. इथे पुनर्विकासाचे कसलेही काम करता येत नाही. या झोपड्यांना सरकारचे संरक्षण असताना महानगरपालिका कारवाई कशी काय करते, पावसाळ्यात घरे तोडण्याची कारवाई करता येत नसतानाही कारवाई कशी झाली, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रातील साकीनाका मोहिली व्हिलेज येथील ८०० रहिवाशांना बेघर करू नका, त्यांना संरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी विधानसभेत केली होती. त्यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रे पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वासन दिले होते. तरीही विकासकाची मनमानी सुरूच असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. बारा सोसायट्यांमध्ये ४० वर्षांपासून ८०० परिवार राहत आहेत. मूळ मालक ४० वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजिस्टर झाले नाही. म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाइकांनी या जागेचे अधिकार विकासकाला दिले आहेत. त्या अधिकारपत्राच्या जोरावर विकासकाने मनमानी सुरू केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे खान म्हणाले. पालिकेच्या कारवाईवर संताप व्यक्त करतानाच पुन्हा अशी बेकायदेशीर कारवाई केल्यास आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारू, असा इशारा वडेट्टीवार आणि नसीम खान यांनी दिला.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमुंबई महानगरपालिका