Join us  

मद्य निर्मितीच्या इतिहासाचे दालन ! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनात निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील व्हिस्की, वाइन आणि बिअर या मद्यनिमिर्ती प्रक्रियेच्या दुर्मीळ इतिहासाची माहिती देणारे नाविन्यपूर्ण असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील व्हिस्की, वाइन आणि बिअर या मद्यनिमिर्ती प्रक्रियेच्या दुर्मीळ इतिहासाची माहिती देणारे नाविन्यपूर्ण असे दालन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या मुंबईतील उत्पादन शुल्क भवनात निर्माण करण्यात आले आहे. मद्य निमिर्तीची संपूर्ण प्रक्रिया दर्शविणारे माहितीपूर्ण चार्ट येथे आहेत. फक्त उत्पादन शुल्क आयुक्तांकडे भेटीसाठी येणाऱ्यांसाठीच हे दालन खुले ठेवण्यात आले आहे.

फोर्ट येथील राज्य उत्पादन शुल्क भवनाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सात वर्षानंतर उत्पादन शुल्क विभागाला सात मजली भवन मिळाले आहे. सातव्या, सहाव्या मजल्यावर विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची दालने आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांचे भव्य दालन सातव्या मजल्यावर आहे. याच दालनात वेगळ्या खोलीत मद्यनिर्मिती प्रक्रियेच्या दुर्मीळ इतिहासाची माहिती देणारे नाविन्यपूर्ण असे दालन विभागाने निर्माण केले आहे. दालनाच्या भितींवर वस्तू दर्शविणाऱ्या खास गोष्टीपासून देशातील व्हिस्की, वाइन आणि बिअर या मद्यनिमिर्ती प्रक्रियेचा दुर्मिळ इतिहास आधोरेखित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया अधिक स्पष्ट समजावी म्हणून खास माहिती फलक लावण्यात आले आहेत.

  दालनात दर्शनी स्तंभावर सुरुवातीच्या काळातील 'बॉम्बे एक्साईज' चे दुर्मिळ असे युनिफॉर्म ठेवण्यात आले आहेत. सोबत 'बॉम्बे एक्साईज' चे बिले सुद्धा आहेत.  उजव्या भिंतीवर 'वाइन इन मेकिंग' चा माहितीपूर्ण असा चार्ट उभारण्यात आला आहे. या चार्टमध्ये दर्शिविलेल्या वस्तूंमुळे वाइन निमिर्तीची प्रक्रिया अधिक स्पष्ट होते.  दालनात दर्शनी भिंतीवर 'बीअर ब्रेविंग प्रॉसेस' चा चार्ट उभारण्यात आला आहे. मल्लिंग प्रक्रियेपासून ते डिस्ट्रिब्युशनपर्यंत सर्व निमिर्ती पायऱ्या चित्र, वस्तूचा वापर करून दर्शिविण्यात आल्या आहेत.  तसेच एका भिंतीवर व्हिस्कीची निर्मिती प्रक्रिया चार्टवर आहे. त्यात अनेक गोष्टींचा उवापोह करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे सुसज्ज असे नवीन भवन आहे. भेटीसाठी अनेक मोठी माणसे आयुक्त दालनात येतात. काहींचा मद्य निर्मिती व्यवसायाशी थेट संबंध असतो. काहीसाठी निर्मिती प्रक्रियेची उत्सुकता असते. अशा सर्वांना मद्य निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट व्हावी, यासाठी या दालनात खास चार्ट निर्माण करण्यात आले आहेत.- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, उत्पादन शुल्क