Join us

दीड लाखाचे मासे चोरणा-याला पकडले

By admin | Updated: January 29, 2015 02:05 IST

फिश टँकमधील दीड लाख रुपये किमतीचे मासे चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला नेहरू नगर पोलिसांनी अटक केली. दुकानात काम

कुर्ला : फिश टँकमधील दीड लाख रुपये किमतीचे मासे चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला नेहरू नगर पोलिसांनी अटक केली. दुकानात काम करणाऱ्या एका १७ वर्षांच्या युवकाने ते चोरले होते. त्याची रवानगी बालसुधारगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले. कुर्ला पूर्व भागात अनेक मासे विक्रीची दुकाने आहेत. यातीलच एका दुकानामधून रविवारी दीड लाख रुपये किमतीचे मासे चोरी झाले होते. सोमवारी नेहमीप्रमाणे या दुकानाच्या मालकाने दुकान उघडले असता, टँकमधून पर्ल आरवाला या जातीचे १२६ मासे गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. या माशांची बाजारभावानुसार किंमत दीड लाखाच्या वर असल्याने त्याने तत्काळ ही बाब नेहरू नगर पोलिसांना सांगितली. दुकानात कसलीही तोडफोड न करताच ही चोरी झाली होती. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या दोन जणांवरच संशय होता. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता १७ वर्षांच्या युवकाने चोरीची कबुली दिली. पर्ल आरवाला ही माशांची जात प्रामुख्याने चीनमध्ये आढळते. या माशांना मागणी असल्याने त्याच्या किमतीदेखील अधिक आहेत. त्यामुळे मालकाच्या नकळत त्याने परस्पर घरी नेले होते, काही दिवस त्यांना मोठे करून ते अधिक भावाने विकायचे, अशी योजना या आरोपीने आखली होती. यासाठी त्याने बनावट चावी तयार करून रविवारी मध्यरात्री ही चोरी केली होती. किमती मासे घरी घेऊन जात असताना त्याने प्लास्टिक पिशवीमध्ये आॅक्सिजन न भरल्याने यातील अनेक मासे मरून गेले. केवळ सात ते आठ मासे जिवंत राहिले होते. (प्रतिनिधी)