Join us

जिल्ह्यात सर्वत्र गारठा वाढला

By admin | Updated: December 1, 2014 22:44 IST

गेल्या आठवड्यापासून रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागात थंडी वाढली आहे. गेली तीन दिवस तर तापमान २० अंशापर्यंत व त्याहून खाली आल्याने बोचरी थंडी पडली असून संपूर्ण जिल्हा गारठला आहे.

रोहा : गेल्या आठवड्यापासून रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागात थंडी वाढली आहे. गेली तीन दिवस तर तापमान २० अंशापर्यंत व त्याहून खाली आल्याने बोचरी थंडी पडली असून संपूर्ण जिल्हा गारठला आहे. दीपावली सणाच्या दरम्यान जाणवत नसलेली थंडी नोव्हेंबरच्या शेवटी हळूहळू जाणवू लागली आहे. सायंकाळी वातावरणात चांगलाच थंडावा निर्माण होऊ लागला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल घडत गेले. तापमान अचानक २० अंशाहून खाली आल्याने थंडीचा जोरदार कडाका पडला आहे. अचानक वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गोष्टींची अचानक गरज भासू लागली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरु आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणाऱ्या कामगारांची थंडीमुळे चांगलीच त्रेधातिरपीट होत आहे. सध्या रोहा तालुक्यात थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)