मुंबई : मागील तीनएक दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानासह किमान तापमानात तीनएक अंशाचा चढउतार नोंदविण्यात येत असतानाच मुंबईवर थंड वाऱ्याचा प्रभाव कायम असल्याने शहर चांगलेच गारठले आहे. तर सकाळच्यावेळेस शहरात धुक्याची चादर पांघारल्याचे चित्र आहे.मुंबईचा १२ अंशापर्यंत खाली घसरलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशावर येऊन ठेपला असला, तरी पुढील ४८ तासांत यात पुन्हा घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परिणामी मुंबईकरांना भरलेली थंडी वर्षाखेरपर्यंत कायम राहणार आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश होते. शनिवारच्या तुलनेत यात २ अंशांनी घसरण झाली. परिणामी किमान तापमानातील या चढ-उतारामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, गेल्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत गारठा वाढला; धुक्याचीही चादर
By admin | Updated: December 22, 2014 02:37 IST