Join us

हॅक केलेल्या वेबसाइटची सुटका

By admin | Updated: December 23, 2014 01:37 IST

मिडल इस्ट सायबर आर्मी या पाकिस्तानी हॅकर्सने बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाईट हॅक केली होती.

नवी मुंबई : मिडल इस्ट सायबर आर्मी या पाकिस्तानी हॅकर्सने बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाईट हॅक केली होती. यासंदर्भात नवी मुंबई सायबर शाखेकडे गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने या वेबसाईटची हॅकर्सच्या तावडीतून सुटका केली आहे.सीबीडी येथील रश्मीकांत मोहपात्रा यांनी वेबसाईट हॅक झाल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे केली होती. सर्च बोर्डिंग स्कूल नावाची ही फ्री वेबसाईट त्यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यामध्ये भारतातील सुमारे १५० तर अमेरिकेच्या २०० बोर्डिंग शाळांची माहिती नमूद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेली ही माहिती होती. परंतु १७ डिसेंबर रोजी मिडल इस्ट आर्मी या पाकिस्तानी हॅकर्स संघटनेने त्यांची वेबसाईट हॅक केली होती. त्यावर पेशावर हल्ल्यातील मृतांची छायाचित्रे टाकण्यात आली होती. तसेच काश्मीर आझाद करण्याची मागणीही केली होती. यासंदर्भात तक्रार दाखल झाली होती.अवघ्या चार दिवसांत गुन्हे शाखेने ही वेबसाईट हॅकरच्या तावडीतून सोडवली आहे. वेबसाईटचा यूआरएल (संकेतस्थळ) परत मिळवल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.मोहपात्रा यांनी त्यांच्या वेबसाईटचा सर्वर अमेरिकेत ठेवलेला आहे, तर यापूर्वी देखील त्यांची वेबसाईट हॅक झालेली आहे. त्यामुळे वेबसाईटचा सर्व्हर भारतात ठेवण्याच्या सूचना मोहपात्रा यांना दिल्याचे सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)